सांग ना गं सखे
आयुष्यभर सोबत राहण्याचे
वचन दिले आपण एकमेकांना
सांग ना गं सखे
कसे तोंड देशील तू आपल्या
दारिद्र्यातील
संकटांना || 1 ||
दुष्काळातील
चातकासारखा
आसुसलेला मी सुखाच्या थेंबांना
सुखाच्या सागरात राहणारी सखे
सांग कसे वाटेल तुला
खच खळग्यात जीवन जगतांना || २ ||
आपल्या संसारात फुललेली फुले
आनंदाने खेळता डोलतांना
सांग ना गं सखे
कसे लाड पुरवशील त्यांचे
फाटकी झोळी शिवातांना || ३ ||
शहरी जीवन सुख समृद्धी दिसेल
तुला हिंडता फिरतांना
सांग ना गं सखे
पश्चाताप तर होणार नाहीना तुला
माझे जीवन सावरतांना || ४ ||
संसाराची स्वप्न रंगवले असतील तू
तारुण्यात पाऊल ठेवतांना
सांग ना गं सखे
स्वप्न भंग तर होत नाहीना तुझे
सोबत माझ्या राहतांना || ५ ||
आनंदी समाधानी दिसतेस तू
माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतांना
सांग ना गं सखे
खरचं स्वप्न पुर्ती आहे तुझी कि
आवर
घालायला शिकलीस भावनांना || ६ ||
तुझ्या आशा आकांक्षा कधी
व्यक्त केल्याच नाही तू
माझे समाधान करतांना
सांग नागं सखे
कसे समजतील मला त्या खुणा
आपले आयुष्य सावरतांना || ७ ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा